Nashik COVID Update : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना नाशिकच्या ग्रामीण भागातही चौथ्या लाटेतील पहिला रुग्ण आढळल्याने शहरी भागात वेगाने प्रसार होण्याच्या शक्यतेने महापालिकेच्या कोरोना सज्जतेचा आढावा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून घेण्यात आला.
त्यात नाशिक महापालिकेने उभारलेले दोन ऑक्सिजन प्लॉन्ट महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ऑक्सिजन बाबतीत नाशिक महापालिका राज्यात सक्षम असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. मागील कोरोनाकाळात बेस्ट प्लान्ट म्हणून मान्यता मिळालेला ऑक्सिजन प्लान्टकडे पुन्हा एकदा कोविडच्या पार्श्वभूमीवर लक्ष लागले आहे. एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत शहरातील सुमारे चार लाखांहून अधिक जणांना कोरोना लागण झाली, तर चार हजारांहून अधिक रुग्णांचा या आजाराने बळी घेतला.
२०२२ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर नाशिककरांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आता तब्बल दीड वर्षांनंतर पुन्हा एकदा केरळ राज्यात कोरोना नवीन व्हेरियंट आढळून आला. पाठोपाठ नाशिकच्या ग्रामिण भागातही कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली.
कोरोना चौथ्या लाटेतील पहिला रुग्ण आढळल्याने नाशिक महापालिकेसह मालेगाव महापालिका, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा उपरुग्णालय, डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेज, एसएनबीटी कॉलेजच्या प्रमुखांची जिल्हा शल्यचिकित्सक यांनी बैठक घेत कोरोना तयारीचा आढावा घेतला. कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी कोरोनाकरिता राखीव बेड, ऑक्सिजन व्यवस्था तसेच औषध साठ्याचा आढावा घेत सर्व सज्जतेची माहिती देण्यात आली.
सर्वाधिक ऑक्सिजन सक्षमता
२०२२ मध्ये नाशिक महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे ऑक्सिजनचा तुटवडादेखील जाणवला. त्या वेळी डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ३० किलोलिटरचे प्रत्येकी दोन, तर तीन किलोमीटरचा लिक्विड मेडीकल ऑक्सिजन (एलएमओ) प्लान्ट तातडीने उभारण्यात आला.
त्याचबरोबर नाशिक रोडच्या स्व. हिंदूह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात २० किलोलिटर व तीन किलोमीटरचे एलएमओ प्लान्ट उभारण्यात आले. त्याचबरोबर झाकिर हुसेन रुग्णालयात प्रेशन स्विंग ॲडझॉर्बमन्ट (पीएसए) व नाशिक रोडच्या रुग्णालयात प्रत्येकी दोन यंत्रणा उभारण्यात आल्या आहेत.
तिसऱ्या लाटेनंतर कोरोना संपुष्टात आल्यानंतरही महापालिकेने प्लान्ट बंद न करता तसेच ठेवले. परिणामी राज्यात सर्वाधिक सक्षम ऑक्सिजन यंत्रणा उपलब्ध आहे. कोरोनाकाळात बेस्ट प्लॉन्ट म्हणून ऑक्सिजन प्लान्टला मान्यता मिळाली आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली.
कॉन्सिन्ट्रेटर हलविले
महापालिकेकडे १८२० ऑक्सिजन कॉन्सिन्ट्रेटर असून यातील बहुतांश दादासाहेब गायकवाड सभागृहात गोडावूनमध्ये ठेवण्यात आले होते. यातील जवळपास २०० कॉन्सिन्ट्रेटर बिटको रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. त्याचबरोबर ४८ मॉनिटर देखील हलविले.
सद्यःस्थिती
एकूण बेड- ७,३५३
– आयसीयू बेड- ५३३
– पीपीई किट- ५०,०००
– ॲन्टिजेन किट- १,७८,०००
– आरटीपीसीआर किट- १०००
– एन- ९५ मास्क- १०००
– व्हेंटिलेटर- १६५
– जम्बो सिलिंडर- ३०००
कोविड लक्षणे
सर्दी, ताप, डोकेदुखी, घसा खवखवणे ही लक्षणे आहेत.