maharashtra News

Nashik News: उदासीन मालकांना भाडेकरूंच्‍या नोंदीचे नाही गांभीर्य; शहरातील पोलिस ठाण्यांमध्ये 12 हजार नोंदी

Nashik News : शहराचा चोहोबाजूंनी विस्‍तार होत असून, ग्रामीण भागातून रोज अनेक कुटुंबकबिला शहरात रोजीरोटीसाठी दाखल होत आहे. स्‍थलांतरितांकडून भाड्याच्‍या घरात वास्‍तव्‍य करताना पोटाची खळगी भरली जाते.

‘स्‍वमालकीचे घर भाड्याने दिल्‍यानंतर त्‍याचा करार करणे आवश्‍यक आहे, त्‍याप्रमाणे भाडेकरूंविषयक माहिती स्‍थानिक पोलिस ठाण्यांना कळविणेही महत्त्वाचे असते. परंतु मालकांमध्ये भाडेकरूंच्‍या नोंदीविषयी गांभीर्य नसल्‍याचे उदासीन चित्र आकडेवारीतून दिसून येते आहे.

प्रत्‍यक्षात पोलिस ठाण्यांमध्ये सुमारे बारा हजार भाडेकरूंच्‍या नोंदी असल्‍या, तरी प्रत्‍यक्षात त्‍यापेक्षा अधिक संख्येने कुटुंब भाडोत्री राहात आहेत. 

गेल्‍या काही वर्षांमध्ये शहरात नोकरी, व्‍यवसायासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भाग तसेच उत्तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील कुटुंबांना नाशिक खुणावत आहे. रोजच शहरातील विविध भागात नव्‍याने वास्‍तव्‍यास येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते आहे. दाखल झालेले सर्वच स्वतःच्या मालकीच्‍या घरात राहातात असे नाही. यापैकी बहुतांशी कुटुंब स्‍थिरस्‍थावर होईपर्यंत भाड्याच्‍या घरात राहात असतात.

त्‍यामुळे शहरात भाडेतत्त्वावरील घरांना चांगली मागणी होते आहे. एखादी सदनिका किंवा जागा भाड्याने देताना कायदेशीर सुरक्षितता म्‍हणून मालकांकडून ११ महिन्‍यांचा करार आवर्जून केला जातो. परंतु यासोबतच भाडेकरू विषयी माहिती नजीकच्‍या पोलिस ठाण्यात कळविण्याबाबत मात्र बहुतांश मालकांमध्ये उदासीनता दिसून येते.

यासंदर्भात पोलिस प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात असते. त्‍यास प्रतिसाद देतभाडेकरूंच्‍या नोंदणी करणे अपेक्षित असताना, प्रत्‍यक्षात काही जागृत मालकच अशा नोंदी करत असल्‍याचे आकडेवारीतून समोर येते. पोलिस दप्तरी सुमारे बारा हजार भाडेकरूंच्‍या नोंदी असून, प्रत्‍यक्षात त्‍यापेक्षा अधिक संख्येने नागरिक भाडेतत्त्वावर राहात आहेत.

का करावी नोंदणी?

घर भाड्याने देताना संबंधित आपले परिचित असतीलच असे नाही. त्‍यामुळे त्‍यांची गुन्‍हेगारी पार्श्वभूमी असेल किंवा गैरकृत्‍यात त्‍यांचा भविष्यात समावेश असेल तर अशावेळी नोंदणी न केल्‍याने मालकांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते.

यापूर्वी अतिरेकी कारवाईमध्ये तसेच मुथूट फायनान्‍ससारख्या दरोड्याच्‍या घटनेत गुन्‍हेगार/दहशतवादी भाडेतत्त्वावर वास्‍तव्‍यास असल्‍याचे समोर आलेले आहे. त्‍यामुळे सावधगिरीचा उपाय म्‍हणून नोंदणी करणे महत्त्वाचे ठरते. भाडेकरूंची वैयक्‍तिक माहिती स्‍थानिक पोलिस ठाण्याला कळविणे अपेक्षित असते.

पोलिस ठाणेनिहाय सरासरी नोंद अशी-

आडगाव- १३२

उपनगर- ६७८

गंगापूर- ९४८

पंचवटी- ५३

इंदिरानगर- ५६

सातपूर- २९१०

अंबड- २९१८

नाशिकरोड- १९६१

सरकारवाडा- ४८०

मुंबई नाका- ६२८

म्‍हसरूळ- १३१

देवळाली कॅम्‍प- १७३

भद्रकाली- ६२१

“घरमालकांनी भाडेकरूंसंदर्भातील माहिती स्‍थानिक पोलिस ठाण्यात कळवावी, असे आवाहन आम्‍ही वेळोवेळी करत असतो. त्‍यास प्रतिसाद देत माहिती देणे अपेक्षित आहे. ऑनलाइन पद्धतीने नाशिक पोलिसांच्‍या संकेतस्‍थळावरही नोंदणी सुविधा उपलब्‍ध आहे.” – डॉ.सीताराम कोल्‍हे, सहाय्यक पोलिस आयुक्‍त, गुन्‍हे शाखा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *