नाशिक : शहर परिसरात घडलेल्या मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणत चोरट्यांकडून पोलिस विभागाने मुद्देमाल हस्तगत केला होता. या वस्तूंचे वाटप शुक्रवारी (ता.५) पोलिस आयुक्तालयात झालेल्या कार्यक्रमात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते मुळ मालकांना केले.
तब्बल ६ कोटी ६६ लाख ७० हजार ६९७ रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल यावेळी परत केला.
गेल्या वर्षभरात दाखल मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणताना सर्व पोलिस ठाणे व गुन्हे शाखा युनिट १, २ व मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले होते. विविध घटनांमध्ये ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल हस्तगत केला होता.
न्यायालयाच्या आदेशानुसार हा मुद्देमाल शुक्रवारी ‘रेझिंग डे’ च्या सप्ताहामध्ये पोलिस मुख्यालयातील भीष्मराज सभागृह येथील कार्यक्रमात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते वस्तूंचे वाटप मुळ मालकाला केले.
कार्यक्रमाप्रसंगी फिर्यादीदार दर्शना आढाव, स्नेहल येलमल्ले, मंगेश काजे, सुनिल यादव, नितीन गवांदे, बापू सुर्यवंशी, कैलास वाघ, पवन शर्मा यांनी मनोगत व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले. गु
न्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, यांच्यासह परिमंडळ २ च्या उपायुक्त मोनिका राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पोलिस उपनिरीक्षक धनराज पाटील यांनी केले. प्रास्ताविक वरीष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढगाळ यांनी केले. आभार सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.सिताराम कोल्हे यांनी मानले.
आठ वेळा मुद्देमाल केला परत
यापूर्वीदेखील नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीत मालाविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणत आठ वेळा जप्त मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम घेत ९ कोटी १४ लाख ०१ हजार ३९९ रुपये किमतीचा मुद्देमाल परत केलेला आहे.
कार्यक्रमातून परत दिलेला मुद्देमाल व रक्कमेचा तपशील
रोख रक्कम——————–२ कोटी ५३ लाख ३१ हजार २००
मोटार वाहन——————–५८ लाख ०५ हजार
सोन्या-चांदीचे दागिने———–३५ लाख ७१ हजार ९९७
मोटार सायकली——————१५ लाख ९५ हजार
मोबाईल फोन——————३ लाख ६७ हजार ५००