Nashik News : तालुक्यासह कसमादेत दुष्काळी परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्याचे काम शहरानजीकच्या निळगव्हाण येथील गोवंश रक्षा समितीची गोशाळा करीत आहे.
‘चारा, पाणी नसेल, तर जनावरे आम्ही सांभाळतो’, या गोशाळेने केलेल्या आवाहनामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. (All materials for cremation free including Gowri from Govansh Raksha Samiti nashik news)
यापुढे जात गोवंश रक्षा समितीने अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या गोवऱ्या, कापूर, तूप, कपडे, टोपी, गुलाल, चंदनाचा हार आदी सर्व साहित्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. समितीचे अध्यक्ष सुभाष मालू व त्यांच्या सहकाऱ्यांचे या उपक्रमाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. अशा स्वरूपाची सेवा देणारी गोवंश रक्षा समिती मालेगावसह कसमादेतील पहिली संस्था ठरली आहे.
तालुक्यातील निळगव्हाण गोशाळेत गायी, बैल, म्हैस, हेला, शेळ्या, मेंढी आदी जनावरे असून, यात गायींचा अधिक समावेश आहे. संस्थेतर्फे त्यांचे संगोपन केले जाते. तालुक्यासह कसमादेत दुष्काळी परिस्थिती आहे. चारा-पाण्याच्या कारणामुळे कोणत्याही परिस्थितीत जनावरे विकू नका, आम्ही विनामूल्य सांभाळ करतो.
चारा-पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर जनावरे घेऊन जा, असे आवाहन गोशाळेने केल्यानंतर त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक शेतकऱ्यांनी संगोपनासाठी गायी गोशाळेकडे सुपूर्द केली आहेत. गोवंश रक्षा समिती जनावरांच्या संगोपनाबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम राबवीत असते. वृक्षतोड थांबवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सातत्याने जनजागृती केली जाते. वृक्षलागवड व संगोपनाला संस्थेतर्फे चालना दिली जाते.
संस्थेने अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या गोवऱ्या, कापूर, तूप, कपडे, टोपी, सरणवर लागणारा चारा, चंदनाचा हार, गुलाल आदी सर्व साहित्य मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित गावांत, तसेच स्मशानभूमीत अंत्यविधीचे साहित्य पोचवले जाणार आहे. समितीचे अध्यक्ष सुभाष मालू, संचालक बद्रिनारायण काळे, कैलास शर्मा, हरिप्रसाद गुप्ता, संजय मेहता, कैलास मेहता, प्रमोद शुक्ला, हरिनिवास प्रजापत, संजय देवरे, गोविंद तोतला आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
”पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षतोड थांबविणे गरजेचे आहे. नागरिकांनी अंत्यसंस्कारासाठी लाकडांऐवजी गोवरीचा वापर करावा. अंत्यसंस्कारासाठी लागणारी सर्व सेवा गोवंश रक्षा समितीतर्फे मोफत देण्यात येईल. यासाठी ९३७१२ ५५२८७, ९४२२२ ५५२८७ या क्रमांकावर संपर्क साधावा. सामाजिक दायित्व म्हणून संस्थेने हा उपक्रम सुरू केला आहे.”– सुभाष मालू, अध्यक्ष, गोवंश रक्षा समिती, गोशाळा निळगव्हाण
”गोवंश रक्षा समिती नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवीत असते. गोवंश व इतर जनावरांचे विनामूल्य संगोपन केले जाते. अंत्यसंस्कारासाठी लागणारे सर्व साहित्य मोफत देण्याचा संस्थेचा निर्णय कौतुकास्पद व आदर्शवत आहे. या निर्णयामुळे वृक्षतोडीला आळा बसून पर्यावरणाला त्याचा फायदा होईल. गोवंश रक्षा समितीचा निर्णय राज्यातील विविध सामाजिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.”– ॲड. सुधीर अक्कर, मालेगाव