maharashtra News

Nashik News : मतदारांची 20 हजार दुबार नावे वगळली; मतदार यादी सोमवारी होणार प्रसिद्ध

Nashik News : जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील मतदारांची २० हजार दुबार नावे जिल्हा निवडणूक शाखेने यादीतून वगळली आहेत. येत्या सोमवारी (ता.२२) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार दरवर्षी जानेवारी महिन्यात विधानसभा मतदार संघनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाते. 

यंदाच्या मतदार यादीला लोकसभा निवडणुकीची किनार असल्यामुळे तिला अतिशय महत्त्व प्राप्त होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा बिगूल फेब्रुवारीत वाजण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विशेष मतदार यादी पुर्नरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये नवमतदार नोंदणीसोबतच मतदारांच्या नाव व पत्त्यात दुरुस्ती केली जात आहे.

याशिवाय मतदार यादीतून दुबार तसेच मृत व्यक्तींची नावे वगळण्याची प्रक्रीया राबविली जात आहे. निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संभाव्य दुबार नावे शोधण्यात येत आहेत. त्यासाठी दोन टप्प्यात तपासणी केली. प्रथमत: कुटुंबातील सदस्य व पत्त्याचा तपशील तसेच समान छायाचित्रे व नावे असलेल्या नोंदींचा यात समावेश आहे.

सॉफ्टवेअरद्वारे अशी संदिग्धता असलेल्या ५४ हजार नावांची पडताळणी केली गेली. त्यामध्ये जिल्ह्यातील १५ मतदारसंघांत आतापर्यंत २० हजारांच्या आसपास दुबार नावे सापडली. प्रशासनाकडून ही सर्व नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.

मतदार यादीत नाव नोंदणी करा

मतदार यादीत नावनोंदणीची प्रक्रिया सुरू असून नागरिकांनी यादीत नाव समाविष्ट करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी वोटर हेल्पलाइन ॲप उपयुक्त आहे.

निवडणूक आयोगाने तयार केलेले ॲप डाऊनलोड करून कोणत्याही शासकीय कार्यालयात न जाता ॲपच्या मदतीने नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करणे शक्य आहे. यादीतील नावात दुरुस्ती व छायाचित्रात बदलही करता येतो.

मृत मतदाराचे नाव नातेवाईक वगळू शकतात.‌ तसेच, घरपोच मोफत मतदान ओळखपत्रही मिळविता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *