नाशिक रेन न्यूज : या थंडीच्या मोसमात अपेक्षेप्रमाणे गारपीट झालेली नसताना आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे बळीराजाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात शनिवारी (ता. 25) पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार असल्याने वातावरणात गारवा निर्माण होण्याची चिन्हे आहेत. (पावसाच्या शक्यतेने शेतकरी चिंतेत नाशिक वृत्त)
अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाल्यामुळे राज्यभर पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून (दि. 23) पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचाही अंदाज आहे.
रायगड, मुंबई, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूरसह नाशिक, सोलापूर, धाराशिव, लातूर, चंद्रपूर जिल्ह्यांत येत्या रविवारपर्यंत (ता. 26) ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी (दि. 25) आणि रविवारी (दि. 26) नाशिक जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
पाऱ्यातील चढ- उतार सुरूच
गेल्या शुक्रवारी (ता. 17) नाशिकचे किमान तापमान 14.1 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी सोमवारी (दि. 20) किमान तापमानाने 21 अंश सेल्सिअसपर्यंत मजल मारली. बुधवारी (दि. 22) पुन्हा तापमानाचा पारा घसरला असून, किमान तापमान 14.7 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
पुढील काही दिवस ढगाळ वातावरणामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता असल्याने तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. चलनातील सततच्या चढ-उतारामुळे नाशिककरही संभ्रमात आहेत.