देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता.१२) नाशिक शहरातील पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिराला भेट दिली. श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतांना ते नतमस्तक झाले. यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती देखील करण्यात आली. यानंतर मोदींची जाहीर सभेत देशातील सर्व मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम चालवण्याचे अवाहन देखील केले आहे. (PM Modi In Kalaram Mandir Nashik Visit)
पंतप्रधान मोदी म्हणाले की, आजचा हा दिवस भारताच्या युवा शक्तीचा दिवस आहे. हा दिवस त्या महापुरुषास समर्थित आहे,ज्याने गुलामीच्या काळात भारताला नव्या उर्जेने भरून टाकलं होतं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी तरुणांसोबत नाशिकमध्ये असणं माझं भाग्य आहे असेही मोदी म्हणाले. आजच भारताच्या नारीशक्तीच्या प्रतिक राजमाता जिजाऊ यांची जयंती आहे.
जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीदिनी त्यांना वंदन करण्यासाठी मला महाराष्ट्राच्या वीरभूमीत येण्याची संधी मिळाली, याचा मला अभिमान असल्याचेही मोदी म्हणाले. भारतातील अनेक महान व्यक्तींचा संबंध महाराष्ट्राशी आहे, हा फक्त योगायोग नसून ही या पुण्यभूमी आणि वीरभूमीचा प्रभाव असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.
याच भूमीने राजमाता जिजाऊ, देवी अहिल्याबाई होळकर, रमाबाई आंबोडकर यासारख्या महान महिला दिल्या. याच धर्तीने देशाला लोकमान्य टिळक, वीर सावरकर, आनंद कन्हेरे, चाफेकर बंधू यांसारखे नेत दिले आहेत. नाशिकच्या पंचवटीत प्रभू श्रीरामांनी खूप वेळ घालवला, या भूमीला मी प्रणाम करतो असेही मोदी म्हणाले.
मी अवाहन केलं होतं की, २२ जानेवारी पर्यंत आपण सगळ्यांनी देशातील तीर्थक्षेत्र, मंदिरांची स्वच्छता करावी. यासाठी अभियान सुरू करावे. आज मला काळाराम मंदिरात दर्शन करण्याचे तसेच मदिर परिसरात साफसफाई करण्याचे सौभाग्य मिळाले. मी देशवासीयांना पुन्हा आग्रह करेल की, राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व मंदिरात आणि तीर्थक्षेत्रांवर स्वच्छता अभियान चालवा आणि श्रमदान करा असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.