PM Modi Nashik Visit : दक्षिणगंगा म्हणून ओळख असणाऱ्या गोदावरी नदीची विधिवत महापूजा करणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान ठरले आहेत. भारत विश्वगुरू व्हावा, यासाठी त्यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १२) सकाळी सव्वाअकराला नाशिकच्या रामतीर्थावर प्रधान संकल्प पूजाविधी करण्यात आला.
रामतीर्थात अर्घ्य दान, सौभाग्य मंगल अर्पण करून गोदाआरतीचा प्रारंभही त्यांनी केला.
विशेष म्हणजे, रामतीर्थावरील अतिप्राचीन गंगा गोदावरी मंदिरातील पुरोहित संघाच्या व्हिजिट बुकमध्ये पंतप्रधानांनी स्वाक्षरी करत या ऐतिहासिक क्षणांची जणू नोंदच केली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी शुक्रवारी नाशिकमध्ये होते. मूळ पेशवाई पगडी परिधान करत त्यांनी रामतीर्थावर गोदावरीची महापूजा केली.
पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, दिलीप शुक्ल, चंद्रशेखर पंचाक्षरी, प्रतीक शुक्ल, वैभव दीक्षित, चंद्रशेखर गायधनी, शेखर शुल्क, अतुल गायधनी, अमित पंचभैये, वैभव बेळे, भालचंद्र शौचे व उपेंद्र देव यांनी मंत्र म्हटले. दहा मिनिटांच्या पूजेत नाव, गोत्राचा उच्चार करण्यात आला. पूजाविधी आटोपल्यानंतर पंतप्रधान मोदींनी गोदापात्रात पाच वेळा अर्घ्य दान केले.
पुरोहित संघातर्फे पंतप्रधानांना चांदीचा अमृत कलश भेट देण्यात आला. २०१५ च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे निमंत्रणाची त्यांना आठवण सतीश शुल्क यांनी करून दिली. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले. गोदावरीच्या पूजेनंतर त्यांनी उपस्थित साधू-मंहतांची भेट घेतली.
याप्रसंगी महामंडलेश्वर स्वामी सविदानंद सरस्वती, महंत भक्तिचरणदास, महंत रामकिशोरदास शास्त्री, महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, महंत रामस्नेहीदास महाराज, महंत महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर, गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, महंत शंकरानंद सरस्वती, भाजप आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले उपस्थित होते.
मोदींना आवडली पेशवाई पगडी
गोदावरी पूजेपूर्वी पंतप्रधान मोदींनी अस्सल पेशवाई पगडी परिधान केली. गंगा गोदावरी पुरोहित संघाने ही मानाची पेशवाई पगडी नाशिकच्या भांडी बाजारातील देवाज (भाग्यश्री ट्रेलर) यांच्याकडून बनवून घेतली.
भारतमातेच्या सेवेचा संकल्प
माझ्याकडून भारतमातेची कायम सेवा घडो. भारताच्या शत्रूचे प्रयत्न निष्प्रभ करण्याचे आणि भारताला सर्वोच्च स्थानावर नेण्याचे बळ मला मिळो. माझ्या हातून सतत देव, देश आणि धर्मकार्य घडो. भारतातील प्रत्येक घटकाची माझ्या हातून सेवा घडो.
कृषिप्रधान भारत सुयोग्य पर्जन्यवृष्टीद्वारा सुजलाम् सुफलाम् व्हावा, भारतावर अनारोग्याचे संकट कधीही न येवो, सर्व भारतीय जिवांचे कल्याण घडविण्यासाठी माझ्या हातून सतत कार्य घडावे यासाठी माता गोदावरी, भगवान कपालेश्वरसहित सर्व इष्ट देवतांनी मला बल प्रदान करावे, असा संकल्प पंतप्रधानांनी गोदावरी आरतीद्वारे केला.
पुरोहित संघाने पंतप्रधानांकडे केलेल्या मागण्या
– नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी पंचवटीतील ५०० एकर जागा केंद्र सरकारने कायमस्वरूपी विकत घ्यावी. त्यासाठी शेतकऱ्यांना पाचपट रक्कम द्यावी
– त्र्यंबकेश्वर ते रामतीर्थापर्यंत गोदावरी नदी स्वच्छतेसाठी प्रदूषित पाण्यास प्रतिबंध घालणारी मोहीम हाती घ्यावी
– नाशिकच्या पुरोहितांकडे असलेल्या ऐतिहासिक वंशावळ जतन करण्यासाठी त्यांना कायमस्वरूपी जागा, खोल्या मिळाव्यात
– धर्मशाळा विक्रीस बंदी घालावी
– कुंभमेळ्यात नाशिकमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी शहराची परिक्रमा घडविणारा सिंहस्थ परिक्रमा मार्ग विकसित करावा.