PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्र्यंबकेश्वर येथील भगवान शंकराच्या दर्शनासाठी यावे, अशी विनंती महंत शंकरानंद सरस्वती यांनी केली आहे. ‘त्र्यंबके भगवान शंकरजी आपकी राह देख रहे है’, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांना आवाहन केले.
‘एक दिन हम जरूर आयेंगे’, असे उत्तर पंतप्रधानांनी आपल्याला दिल्याचे महंत शंकरानंद सरस्वती यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते शुक्रवारी सकाळी रामतीर्थावर गोदावरी महापूजा झाली. या वेळी महामंडलेश्वर स्वामी सविदानंद सरस्वती, महंत भक्तिचरणदास, महंत रामकिशोरदास शास्त्री, महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज, महंत रामस्नेहीदास महाराज, महंत महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर, गुरुमाउली अण्णासाहेब मोरे, महंत शंकरानंद सरस्वती, भाजप आध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले उपस्थित होते.
महापूजेनंतर पंतप्रधानांनी या साधू-महंतांची भेट घेतली. या भेटीत शंकरानंद सरस्वती यांनी त्र्यंबकेश्वर येथे भगवान शंकराच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी त्र्यंबकेश्वरला येण्याचे मान्य केल्याचे सांगण्यात येते. पंतप्रधानांनी आपली भेट घेत संवाद साधल्याने साधू-महंत उत्साहित झाले.
”येत्या २२ तारखेला अयोध्येत होणाऱ्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा प्रारंभ नाशिकमधून झाला. नाशिकमधील राममंदिर, गोदावरी नदीची पूजा करताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता दिसून आली. देशात सर्वत्र प्रभू श्री रामाचे नाव संचारले आहे.”– महामंडलेश्वर स्वामी सविदानंद सरस्वती, कैलास मठ, पंचवटी
”प्रभू श्री रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीला पंतप्रधान मोदी यांनी भेट दिल्याचा आनंद झाला. गोदावरीची पूजा करणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. अयोध्येतील राम मंदिरापूर्वी नाशिकच्या मंदिरात पूजा झाली, हा आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे.”– महंत भक्तिचरणदास, अध्यक्ष- पंचमुखी हनुमान देवस्थान
”राष्ट्राची अस्मिता असलेल्या रामलल्ला मंदिराची उभारणी होत असताना नाशिकच्या मंदिराला पंतप्रधान भेट देतात, याला विशेष महत्त्व आहे. धर्माधिष्ठित त्यांचे राजकीय जीवन समर्पित असल्यामुळे महाराष्ट्रातील भाविक, वारकरी यांना त्यांच्या नाशिकला येण्याने आनंद झाला.”- महंत महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लहवितकर
”पंतप्रधान मोदी नाशिकला येऊन भेटल्याचा आनंद वाटला. त्यांच्या येण्याने वातावरण उत्साहित झाले. सर्वत्र ‘जय श्रीरामाचा’ जप सुरू झाला आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उत्सवाची तयारी नाशिकमधून झाली, असे म्हणायला हरकत नाही.”– महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज