PM Modi Nashik Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक नाशिकमधून लढविण्याबाबतच्या प्रस्तावाला विविधस्तरांवरुन सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांप्रमाणे राजकीय क्षेत्रातूनही मोदींच्या उमेदवारीच्या प्रस्तावाचे स्वागत केले आहे.
त्यांनी येथून नेतृत्व केल्यास नाशिकच्या विकासाची गती वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यानिमित्त व्यक्त केला आहे.
राजकीय पक्षाची भूमिकेपासून तर अन्य विविध बाबींमध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये क्वचितच एकमत होते. परंतु पंतप्रधान मोदींच्या उमेदवारीबाबत बहुतांश पक्षांमध्ये सकारात्मक प्रतिक्रिया उमटतांना दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांपासून नाशिकचा विकास मंदावलेला असताना मोदींच्या नेतृत्वात विकासाला चालना मिळेल. सर्वांगिण विकास घडण्याच्या दृष्टीने त्यांची उमेदवारी निर्णायक पाऊल ठरेल, असे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून उमेदवारी केल्यास बिनविरोध निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला जाईल. गेल्या नऊ वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वाखाली देशाचा चौफेर विकास सुरु असून, नाशिकला त्यांचे नेतृत्व लाभले तर येथेही प्रगतीला चालना मिळेल. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमाणे मोदींनाही बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न केले जातील.”– हेमंत गोडसे, खासदार, नाशिक लोकसभा मतदारसंघ.
”सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशात व जागतिकस्तरावरील सर्वात शक्तीशाली नेते म्हणून पुढे आलेले आहे. नाशिकचे खासदार देशाचे पंतप्रधान बनले तर येथील प्रगतीच्या दृष्टीने ही ऐतिहासिक घटना घडेल. शैक्षणिक, औद्योगिक विकासाच्या दृष्टीने सकारात्मक बदल बघायला मिळतील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीचे सर्वच स्वागत करतील असे वाटते.”– ॲड.नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र.
”नरेंद्र मोदींनी नाशिकमधून निवडणूक लढवल्यास नाशिकचाच नव्हे तर संपूर्ण राज्याचा विकास होईल. नवीन उद्योगाबरोबरच हायटेक संसाधने तंत्रज्ञान आणि कृषी क्षेत्राला एकंदरीतच बूस्टर मिळू शकतो. सहकाराच्या उद्धारातून नवीन नोकऱ्यांचा जन्म होऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळू शकते. कृषी, उद्योग, कुंभनगरीची ओळख मोदींच्या प्रतिनिधित्वामुळे जगाच्या नकाशावर नाशिक चकाकून दिसेल.”– निवृत्ती अरींगळे, ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
”पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ राष्ट्राचे नव्हे तर जगाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी देशातील कुठल्याही मतदार संघातून निवडणूक लढविल्यास मतदार त्यांना निवडून देतील. मोदींनी उमेदवारीसाठी नाशिकची निवड करणे हा नाशिककरांसाठी बहुमान ठरेल. राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्व पक्ष या निर्णयाचे स्वागत करतील. त्यांच्या नेतृत्वामुळे नाशिकसह संपूर्ण राज्याच्या विकासाला चालना मिळेल.’‘- अजय बोरस्ते, जिल्हाप्रमुख, शिवसेना (शिंदे गट).
”कोरोना महामारीच्या काळात वाराणसीमध्ये मृत्यू तांडव झालेला असताना, नाशिकचे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकप्रतिनिधी म्हणून स्वीकारतील असे वाटत नाही. पंतप्रधानांना वारंवार मतदार संघ बदलावा लागणे म्हणजे जनतेचा कौल त्यांच्याकडे नाही, हे स्पष्ट होते.”– ॲड. आकाश छाजेड, शहराध्यक्ष, काँग्रेस.