पुणे : घरासमोर असलेल्या दुचाकीचा जोरात हॉर्न वाजवल्याने भाडेकरूने थेट घरमालकाचाच खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील हडपसर रस्त्यावरील उरुळी देवाची परिसरात ही घटना घडली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भाडेकरूने मालकाचा पाण्याच्या टाकीत बुडवून खून केला. संतोष राजेंद्र धोत्रे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. दादा ज्ञानदेव घुले असे खून झालेल्या घरमालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धोत्रे हा घुले यांच्या चाळीत भाडेकरू आहे. सोमवारी दुपारी धोत्रे दारू पिऊन घरी झोपायला गेले. त्यावेळी घरासमोर घुले याने दुचाकीचा हॉर्न जोरात वाजवला. निद्रानाश झाल्याने धोत्रे यांनी घुले यांना मारहाण केली. त्यानंतर धोत्रे यांनी घुले यांचा पार्किंगमधील पाण्याच्या टाकीत बुडवून खून केला.
रात्री उशिरापर्यंत घुले घरी न आल्याने कुटुंबीयांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. तपासादरम्यान सोमवारी घुले आणि धोत्रे यांच्यात भांडण झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान, पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.