राज्यात काही जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्यातील अनेक भागात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळी साताऱ्यासह, पुणे शहर परिसरात पावसाने हजेरी लावली.
पुणे शहर परिसरात आज पहाटेपासूनच परिसरात ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं उकाडाही जाणवत होता. त्यानंतर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांची त्रेधातिरपट उडाली. कोथरूड, पाषाण, सुस, लोणी काळभोर परिसरात पावसाने हजेरी लावली.
राज्यात आज बहुतेक ठिकाणी हवामान ढगाळ राहणार असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आले आहे. तर १२ जानेवारीपासून राज्यात हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान आज हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासात तमिळनाडू किनारपट्टी भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यासोबतच पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारी आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटक, केरळ, आणि लक्षद्वीपमध्ये गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.
तर, उत्तरेकडे वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आज (मंगळवारी) संपूर्ण उत्तर भारत आणि जवळच्या काही भागातील वातावरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.