Sakal Book Publication : जिजाऊ नाशिकमध्ये शत्रूच्या अटकेत होत्या त्या वेळी स्वराज्य निर्माणचा निर्धार त्यांनी केला अन् नाशिकमध्ये स्वराज्य निर्माणच बीज रोवलं गेलं. स्वराज्य निर्माणाच्या ध्येयात जिजाऊ आणि शहाजी राजांमध्ये किंचितही अंतर नव्हतं. बखरकारांनी त्याचा ऊहापोह केला.
शिवाजी महाराजांच्या प्रत्येक निर्णयात जिजाऊंचा अंश आहे.
नीती, मूल्य अन् महिलांची प्रतिष्ठा महाराष्ट्राला देणारी जिजाऊ मला भगवद्गीतेसारखी वाटते, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रकाश पवार यांनी मंगळवारी (ता. २६) येथे केले. ‘राजमाता जिजाऊ’ या विषयावर व्याख्यानात ते बोलत होते.
प्रकाश पवार यांच्या ‘राजमाता जिजाऊ
सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार’ या पुस्तकाचे मंगळवारी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. निवृत्त सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक बी. जी. वाघ अध्यक्षस्थानी होते. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर, ज्योती स्टोअर्सचे संचालक वसंत खैरनार यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
पवार म्हणाले, जिजाऊंनी मूल्यांच्या आधारे शिवरायांच्या व्यक्तिमत्त्वाची उभारणी केली. मूल्यांसाठी जगणं, मरणं आणि लढणं, हे शिवरायांच्या विचारांत त्यांनी रुजवलं. बंगलोर येथे राजसत्तेचा त्याग करून स्वशासनासाठी त्यांनी संकल्प केला. अनेक आघात त्यांच्यावर झाले; मात्र भावनिक अन् वैचारिक क्षमतेवर त्यांनी निर्णय घेतले.
शहाजी राज्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्ती कोंढाणा (आताचा सिंहगड) येथे आणून त्यावर शास्त्रानुसार विधी केले. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची जागतिक राजकीय अर्थव्यवस्थेची तत्त्वे दिली. इतकंच नव्हे, तर संभाजी राजांच्या पत्नीला देखील त्यांनी शास्त्र, शस्त्र अन् राज्यकारभाराचं ज्ञान दिलं.
महाराष्ट्राच्या भूमीत जे लपलं आहे ते शिवरायांच्या पुढे आणण्याचं काम त्यांनी केलं. जिथे गरज तिथेच तलवार उगारण्याचं तत्त्व शिवरायांना दिलं. मात्र जिजाऊंच्या या इतिहासाची मांडणी इतिहासकार, बखरकार यांनी वेगळ्या पद्धतीने मांडत त्याचा ऊहापोह केला. कागद बोलतो, या उक्तीप्रमाणे त्यांनी रचलेल्या इतिहासाने थैमान घातलं आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
इतिहास रंगवणं सोपं आहे, मात्र समजावून घेणं अवघड आहे, हे त्यांनी विशेष नमूद केलं.
ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला होता, त्याप्रमाणे जिजाऊंनी शिवरायांना स्वराज्य स्थापनेसाठी मार्ग दाखविला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बी. जी. वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून केले.
डॉ. रनाळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. वाचकांच्या अभिव्यक्तीला स्थान देण्याचा सकाळ प्रकाशनाचा प्रयत्न आहे. ‘सकाळ’ प्रकाशनाचा एक दशकाचा प्रवासात विविध विषयांवर प्रकाशित पुस्तकांच्या ३० लाख प्रतींची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.