maharashtra News

Sambhaji News : महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक असा सुवर्ण त्रिकोणाने जोडणार महाराष्ट्राचा आयटी उद्योग ; मराठवाड्यासह पुणे, नागपूरला होणार फायदा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र-गोवा-कर्नाटक असा आयटी उद्योग समूहांचा सुवर्ण त्रिकोण साकारावा यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबत नुकतीच एक बैठक बंगळुरु येथे पार पडली असून याचा मराठवाड्यातील आयटी उद्योगाला देखील मोठा फायदा होणार आहे. ‘डिजिटल नोमॅड’ प्रकल्पान्वये या संकल्पनेची पाया भरणी सुरू झाली असून गोवा सरकारने यास मान्यता देखील प्रदान केली आहे.

देशातील आयटी उद्योग आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा पर्यटन मंत्रालयाने पाऊल उचलले आहे. यासाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आलेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक असा सुवर्ण त्रिकोण साकारण्यासाठी गोवा सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. याबाबत नुकतीच एक बैठक बंगळुरु येथे पार पडली. प्राथमिक टप्प्यात असलेला हा प्रयोग पुढील तीन वर्षांत साकार होईल अशी सूत्रांची माहिती आहे.

या अंतर्गत एकमेकांशी विविध प्रकल्पांसाठी उद्योजकीय भागीदारी, सेवा सहभाग, स्टार्टअप आदी घटकांतून आदान-प्रदान होणार आहे. हा आयटी उद्योगाचा सुवर्ण त्रिकोण साकार झाल्यास याचा महाराष्ट्रातील पुणे, नागपूरसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आयटी उद्योगांना देखील मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. रोजगार निर्मिती होऊन आयटी उद्योगाला चालना मिळणार आहे.

दरम्यान गोवा सरकारने यासाठी स्टार्टअप अंतर्गत राज्यातील काही निवडक निसर्गसंपन्न ठिकाणे निवडून तेथे ‘आयटी डिजिटल को वर्किंग स्टेशन’ (निसर्ग संपन्न ) उभारण्यास मान्यता दिलेली आहे. समुद्र किनारे, वारसा स्थळे येथे ही स्टेशन्स उभारली जाणार आहेत. जेणेकरून समृद्ध निसर्गाच्या सांनिध्यात आयटी उद्योगांना येथे काम करता येईल. शिवाय हे स्टेशन पूर्णतः इको फ्रेंडली असतील याची काळजी घेतली जाणार आहे. या स्टेशन्समध्ये आयटी उद्योगांना आवश्यक सवलती सहजरित्या प्रदान केल्या जाणार आहेत.

डिजिटल नोमॅड ही आधुनिक संकल्पना आहे. आम्ही ती खास आयटी उद्योजक आणि नोकरदारांसाठी सुरू केली आहे. तसेच आयटीचा सुवर्ण त्रिकोण साकारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आम्ही आयटी क्षेत्रातील उद्योजक, तज्ज्ञांशी चर्चा करीत आहोत. महाराष्ट्रातील आयटी हबच्या सोबतीने विकासाचा सेतू साकार करण्याचा आमचा प्रयास आहे.

– डी.एस. प्रशांत, सीईओ, स्टार्टअप आणि आयटी सेल, गोवा राज्य

काय आहे डिजिटल नोमॅड?

डिजिटल नोमॅड ही आधुनिक संकल्पना आहे. तंत्रस्नेही असेलला कुशल कामगार जो कुठेही काम करू शकतो. त्याला कंपनी अथवा संस्थेच्या एकाच जागी असलेल्या कार्यालयातून काम करणे बंधनकारक नसते. तो कुठेही आपल्याजवळ असलेल्या मल्टिमीडिया साधनांद्वारे आपले काम करतो. जवळपास ४५ देशांत अशा कर्मचाऱ्यांना व्हिसा देण्याची खास तरतूद आहे. भारत सरकारचेही यावर काम सुरू आहे.

आम्ही अशा भविष्याची कल्पना करतो जिथे पर्यटक आणि यजमान समान पातळीवर असतील. जे केवळ एका राज्याचे, देशाचेच नाही तर पृथ्वीचेच भविष्य ठरवतील. या बदलामुळे स्थानिक समुदायांना सामर्थ्य मिळेल. आम्ही अध्यात्म, संस्कृती, सभ्य राष्ट्रवाद व जागरूक पर्यटनावर भर देऊन भारतीय पर्यटनाला एक नवीन स्वरूप देत आहोत.

– रोहन खंवटे, मंत्री, माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि पर्यटन, गोवा राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *