maharashtra News

Solapur News : वाहनचालकांच्या बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव उद्या (बुधवारी) बंद ठेवले जाणार आहेत. दुसरीकडे भाजीपाल्यांसह फळे, भुसार मालाचीही आवक कमी झाली आहे.

ट्रक चालकांच्या संपामुळे बाजार समितीतील अंदाजे १४ कोटींची उलाढाल ठप्प राहील. दुसरीकडे अनेक पंपांवरील पेट्रोलचा साठा संपला असून त्यांचीही कोट्यवधींची उलाढाल बंद आहे. बाजारपेठांमधील भुसार व्यापाऱ्यांचीही ८० ते ९० कोटींची उलाढाल संपामुळे थांबली आहे.

संपामुळे ट्रान्सपोर्टची वाहने सध्या जागीच उभी आहेत. अनेक व्यापाऱ्यांनी मागणी केलेला भुसार माल अडकून पडला आहे. दुसरीकडे लिलाव झालेला कांदा व इतर वस्तूंची वाहतूक करण्यास व्यापाऱ्यांना अडचणी आहेत.

त्यामुळे बाजार समितीतील लिलाव उद्या बंद राहणार आहे. तसेच ट्रान्सपोर्ट वाहनांमधून पुरवठा होणारी इंधन वाहतूक होत नसल्याची सद्य:स्थिती आहे. दुसरीकडे शेतमालाची दूरवरून वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

सोलापूर जिल्ह्यातून हजारो क्विंटल कांदा दररोज बंगळुरूच्या बाजारात विक्रीसाठी जातो. आता या संपामुळे ती वाहतूक बंद आहे. पंप चालकांची अंदाजे पाच कोटींची तर बाजार समितीतील १४ कोटींपर्यंत आणि भुसार व्यापाऱ्यांची ९० कोटींपर्यंत उलाढाल या संपामुळे थांबल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांसह सर्वसामान्य ग्राहकांची मोठी पंचाईत झाली असून जिवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने संपावर तातडीने तोडगा काढावा, अशी सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांची मागणी आहे.

संपाचा परिणाम

  • मार्केट यार्डात वाहने कमी आल्याने भाजीपाल्याची आवक घटली
  • गॅस सिलेंडरचा पूरवठा विस्कळीत
  • अनेक पेट्रोल पंपांवर दुपारपासून नो स्टॉकचे फलक
  • गॅस सिलिंडर वाहतूक करणारे ट्रक न आल्याने अनेकांची धावपळ
  • स्कूल बस वाहतुकीवरही परिणाम, पालकांना मुलांच्या शाळेची चिंता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *