Pathardi Srushti Sakla: आई -वडील मूकबधीर. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. संसाराचा गाडा हाकणारे वडील कापड दुकानात कामाला. या परिस्थितीची जाणीव ठेवत मुलीने सातासमुद्रापार शिक्षणासाठी उड्डाण घेतले. ही प्रेरणादायी संघर्षकहाणी आहे, पाथर्डी तालुक्यातील सृष्टी साकला हिची.
घरच्या परिस्थितीची आणि मूकबधीर आईवडीलांच्या कष्टाची जाण ठेवत सृष्टीने धडाडीने अभ्यास केला. आता उच्चशिक्षणासाठी थेट जर्मनीला रवाना झालीय. ही उत्तुंग झेप आता अनेकांना प्रेरणा देणारी ठरत आहे.
दिलीप साकला व त्यांची पत्नी ज्योती हे दोघेही मूकबधीर. त्यांना तीन मुली व एक मुलगा. दोन मुलींची लग्ने झाली असून मुलगा निसर्ग शिक्षण घेतोय. घरची परिस्थिती नाजूक. सृष्टीची शिक्षणातील प्रगती पाहून दोघांनीही तिला प्रोत्साहन दिले.
सृष्टीला शिक्षणाची गरज होती, मात्र तेवढा खर्च झेपणे शक्य नव्हते. म्हणून त्यांनी सृष्टीला बार्शी येथील आत्या बेबीताई ताथेड यांच्याकडे पाठवले. बार्शी येथे सृष्टीने संगणक अभियांत्रिकीतील पदवी ए प्लस श्रेणीत घेतली. त्यानंतर तिला पुण्यातील बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. मात्र पदव्युत्तर शिक्षणाचे स्वप्न तिला स्वस्थ बसू देत नव्हते. त्यामुळे दोन वर्ष नोकरी व अभ्यास या दोन्हीचा समतोल साधला. चिकाटी व जिद्दीमुळे तिची संगणक अभियांत्रिकीतील पदव्युत्तर शिक्षणासाठी जर्मनी येथे निवड झाली.
पाठीवर कौतुकाची थाप
या यशाबद्दल जैन युथ फेडरेशनच्या वतीने तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी फेडरेशनचे अध्यक्ष सचिन भंडारी, प्रमोद खाटेर, अजय भंडारी, राजेंद्र गुगळे, निलेश खाबिया, सुनील कटारिया, महावीर कर्णावट, श्रेयस चोरडिया, अल्पेश भंडारी, राजेंद्र भंडारी, नीलेश गांधी, साहिल लुनावत, शुभम बाफना आदी उपस्थित होते. शहरातील जैन ज्ञान प्रसारक मंडळ यांच्याकडूनही सन्मान करण्यात आला. यावेळी मंडळाचे सचिव सतीश गुगळे, सुरेश कुचेरीया, धरमचंद गुगळे, डॉ. ललित गुगळे होते.
घरची परिस्थिती बिकट होती. मात्र कधीही भांडवल केले नाही. आई वडिलांची तळमळ समजत होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी कष्ट घेतले. त्याचे हे फळ आहे. आत्या बेबीताई ताथेड यांची मदत लाखमोलाची आहे- सृष्टी साकला