maharashtra News

Winter Cold : थंडी गायब; उबदार कपड्यांच्या मार्केटला झळ

छत्रपती संभाजीनगर – थंडीची चाहूल लागताच शहरवासीय मध्यवर्ती बसस्थानकाजवळील तिबेटियन मार्केटमध्ये उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी करतात. मात्र, नोव्हेंबर महिना संपत आला तरी पुरेशी थंडी जाणवत नाही. याची झळ उबदार कपडे विक्री करणाऱ्यांना बसत आहे. यंदा थंडी कमी राहिली तर ग्राहकांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

आज तिबेटच्या बाजारात दररोज सरासरी 4 ते 5 उबदार कपडे विकले जातात. थंडी वाढल्यास हीच संख्या 50 ते 60 पर्यंत जाऊ शकते, असे विक्रेत्यांनी सांगितले. गेल्या दोन महिन्यांपासून तिबेटी मार्केटमध्ये एकूण 50 स्टॉल्स लावण्यात आले आहेत. गेल्या वर्षी मालाची विक्री झाली असली तरी काही माल तसाच आहे.

मात्र, यावेळीही अशीच स्थिती राहिल्यास बराचसा माल शिल्लक राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. जानेवारी अखेरपर्यंत हे स्टॉल सुरू राहणार आहेत. यंदा काही उबदार कपड्यांच्या किमती कमी झाल्या आहेत, तर काहींचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती तिबेटियन स्वेटर विक्रेते संघटनेचे अध्यक्ष एस. डी.चौबेल म्हणाले.

तिबेटियन मार्केटमधील सध्याचे दर (रुपयांमध्ये)

  • जर्किंग – ५५० ते १,५००
  • जॅकेट – ४५० ते १,३००
  • कॅप – १०० ते २७०
  • मफलर – २००
  • स्वेटर – ७९० ते १,३८०
  • शॉल – ४०० ते १,२००
  • उबदार शूज – २०० ते ५००
  • हॅन्डग्लोज – १५० ते २५०
  • सॉक्स – १५० ते २५०

तापमान वाढलेलेच

मागील आठवड्यात पहाटेचे तापमान १३ ते १८ अंश सेल्सिअसदरम्यान राहिले आहे. तर दिवसभराचे तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातील पहाटेचे तापमान किमान ९ अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे यंदा थंडी गायब असून याचा परिणाम उबदार कपडे विक्रेत्यांवर झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *