शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे.
शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता टीका केली आहे. एका खासदाराला निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी प्रयत्न केला. तसंच आता आम्ही त्यांच्याविरोधात उमेदवार दिला तर तो आम्ही निवडून आणणारच अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. त्यावर आता अमोल कोल्हेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
बोलताना अमोल कोल्हे म्हणाले की, ‘पक्ष एकत्र असताना सर्व नेत्यांचं सहकार्य होतं. आता परिस्थिती बदलली म्हणून खोटं बोलणं हे माझ्या तत्त्वात बसत नाही. ही वस्तूस्थिती आहे. या दोन्ही नेत्यांनी १०० टक्के प्रयत्न केले. ते नाकारण्याचे काहीच कारण नाही. अजित दादा मोठे नेते आहेत. इतक्या मोठ्या नेत्याबाबत बोलायला मी फार लहान कार्यकर्ता आहे.’
‘ना माझी राजकारणातील पार्श्वभूमी आहे ना, माझ्याकडे कोणती शिक्षणसंस्था आहे ना, माझ्याकडे कोणता कारखाना आहे. त्यामुळे अशा मोठ्या नेत्यांने असं काही बोलल्यानंतर लगेच त्यावर बातम्यांमध्ये येण्यासाठी प्रत्युत्तर देणं हे मला पटतं नाही, मला दिलेली जबाबदारी पार पाडणं मला महत्त्वाचं वाटतं. शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली मी यापुढेही शिरूर मतदारसंघात जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मार्गी लावतं राहीन. मला नाही वाटतं की, अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याविषयी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही प्रतिक्रिया द्यावी’, असंही पुढे ते म्हणालेत.
तर अजित पवारांनी बोलताना म्हटलं की, ‘अमोल कोल्हे यांनी ५ वर्षे मतदारसंघाकडे पाठ फिरवली, काहीही कामे केली नाहीत’, त्यावर अमोल कोल्हे म्हणाले की, ‘अजित पवारांनी आपल्या भाषणात, कार्यक्रमात माझ्या कामाचं कौतुक केलं आहे. मला वाटतंय फीड देणाऱ्यांनी काहीतरी चुकीचा फीड दिला असावा. यामध्ये काही विसंवाद झाला असावा. मी प्रामाणिकपणे सांगतो, मी काम केलं नसतं तर कोरोनाच्या काळात ५ लाख नागरिकांना लसीकरण करणारा आपला देशातील पहिला जिल्हा आहे. अनेक प्रकल्प येत आहेत. ३० हजार कोटींचे प्रकल्प शिरूरमध्ये येत आहेत’.
‘निवडणूक हे केवळ माध्यम असतं. सत्ता हे केवळ साधन आहे. सत्ता येते जाते. पद येतात जातात. त्यामुळे आपण काम करणं महत्त्वाचं असतं. तत्व, निष्ठा, मुल्य या गोष्टी एका जागी ठेवून काम करणं महत्त्वाचं वाटतं, त्यानुसार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे’, असंही ते पुढे म्हणाले आहे.
‘ अजित पवारांनी असं का म्हटलं ते तेच सांगू शकतील.त्यांच्याविषयी कोणतेही तर्क लावणं किंवा भाष्य करणं मला उचित वाटतं नाही’, असंही कोल्हे यावेळी म्हणालेत.
मला पक्षाने तिकीट दिलं तर शंभर टक्के लढणार
‘मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करणार. मला पक्षाने तिकीट दिलं तर शंभर टक्के लढणार. मी माझ्या मतदारसंघात पाच वर्षापासून काम करत आहे. मतदारसंघात विकासकामे केली आहेत. शरद पवार जो निर्णय घेतील तो मान्य असेल’, असं कोल्हे यांनी म्हटलं आहे.
दादांनी आमच्यासोबत उभं राहावं
‘कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. शेतकरी संतापले आहेत. शेतकऱ्यांचं नुकसान किती होतंय, ही गोष्ट अजित पवारांना माहीत असेल. दुधाबाबत काय परिस्थिती आहे, ही माहीत असेल. हा विषय घेऊन पुढे जात असू शेतकऱ्यांचं म्हणणं मांडत असू तर त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. ते सरकारमध्ये आहेत. त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारकडे कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी आमच्या सूरात सूर मिसळून शेतकऱ्यांच्या बाजूने बोललं पाहिजे. उभं राहिलं पाहिजे’, असंही कोल्हे माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
जे खासगीत बोललो, ते खासगीत राहू द्या
अमोल कोल्हे खासगीत राजीनामा देणार असल्याचं सांगितल्याचं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. यावर बोलताना कोल्हे म्हणाले की, “मला वाटतं विश्वासाने काही गोष्टी खासगीत सांगण्याच्या असतात, त्या खासगीत ठेवण्याचा संकेत असतो. मला वाटतं हा संकेत माझ्याकडून तरी किमान पाळला जावा. त्यामुळे माझं असं काही बोलणं झालं असेल, तर ते खासगीतच राहावं असं मला वाटतं, ते मला सांगता येणार नाहीत, असंही ते पुढे म्हणाले आहेत.”