पुणेः फेब्रुवारी-मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होईल. एका बाजूला एनडीए तर दुसऱ्या बाजूला सर्व भाजप विरोधकांनी तयार केलेली इंडिया आघाडी, अशी लढत होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक महत्त्वाची बातमी असून गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये आता मतदान केंद्र असणार आहेत.
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहरी भागांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निर्णयामुळे मतदारांना मतदानासाठी तासन्तास रांगेत उभं राहण्याची गरज पडणार नाही. गृहनिर्माण सोसायटीच्या परिसरातील नागरिकांनाही सोसायटीमध्ये मतदानाला जावं लागेल.
विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने मोठ्या शहरांमध्ये अशा प्रकारे सोसायट्यांमध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेले आहे. यामध्ये राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, रायगड, ठाणे अशा जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यामुळे या भागांमध्ये यावेळी सोसायट्यांमध्ये मतदान होईल.
पुण्यातील ३६ गृहनिर्माण सोसायट्यांचा समावेश
आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पुण्यातील ३६ गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान होणार आहे. शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यातील जवळपास १५० सोसायट्यांमध्ये लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार स्थानिक जिल्हा प्रशासन आखणी करत आहे.