Prakash Raj South Actor Interview : साऊथचे प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे पुन्हा एकदा त्यांच्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. आता त्यांनी आपल्याला राजकीय पक्षांची आलेली ऑफर्स याबद्दल ठणकावून सांगितलं आहे.
माझ्याकडे तीन राजकीय पक्ष आमच्या पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवता का अशी विचारणा करण्यासाठी आले होते. मी केवळ पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करतो म्हणून ते राजकीय पक्ष माझ्याकडे आले होते. अशा शब्दांत अभिनेत्यानं त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रकाश राज यांनी केरळ मधील साहित्य महोत्सवामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मलाही आता पर्यत तीन राजकीय पक्षांची ऑफर आली आहे. पण मला त्यात अडकून पडायचे नाही. मी आता माझा फोन बंद करुन टाकला आहे. ते माझ्या किंवा जनतेच्या विचारधारेचा विचार करुन माझ्याकडे आलेले नाहीत. हे मला माहिती आहे. त्यामुळे मला त्यांच्या जाळ्यात अडकायचे नाही.
आता जे काही राजकीय पक्ष आहेत त्यांनी त्यांचा आवाज गमावला आहे. त्यात काही सच्चेपणा राहिलेला नाही. त्यामुळे आता वेगवेगळे राजकीय संघर्ष होत आहेत, त्यांना उमेदवार शोधावे लागत आहेत. या देशात कोणी उमेदवार राहिलेला नाही. जेव्हा राजकीय पक्षांना उमेदवार शोधण्याची वेळ येते त्याचा अर्थ काय होतो हे वेगळं सांगण्याची गरज नाही. असेही प्रकाश राज यांनी यावेळी सांगितले. जनसत्तानं याबाबत अधिक माहिती देणारे वृत्त दिले आहे.
पंतप्रधानांशी माझा कुठलाही वाद नाही….
अभिनेत्यानं सांगितलं की, राजकीय पक्षांची आणि माझी विचारधारा यात तफावत आहे. त्यामुळे माझे वाद होतात. त्यामुळे मी व्यक्त होतो. यात माझा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कुठलाही वाद नाही. मोदी काय माझे सासरे आहेत का, तेव्हा मला त्यांचा राग वाटेल? मला त्यांना सांगायचे आहे की, मी एक देशाचा टॅक्स देणारा व्यक्ती आहे.
मी माझा पगार तुम्हाला देतो आहे आणि तुम्ही माझ्याशी कसे वागता, हे मला सांगायचे आहे. मी मोदींना त्यांचे काम करायला सांगतो आहे. मी तेच बोलतो जे मला आग्रहानं सांगायला हवे. त्यासाठी मला ट्रोल केले जाते याचे मला काहीही वाटत नाही. जे चूकीचे घडते ते सांगायला नको का, हेच मला विचारायचे आहे. अशा शब्दांत प्रकाश राज यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.