तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे रेवंथ रेड्डी गुरुवारी हैदराबाद येथे शपथ घेणार आहेत
नवी दिल्ली: काँग्रेसचे रेवंत रेड्डी गुरुवारी हैदराबादमध्ये तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला तेलंगणातच यश मिळाले. तेलंगणाच्या स्थापनेनंतर दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच तेलंगणात काँग्रेसचा मुख्यमंत्री सत्तेवर येत आहे.
या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्या सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदी निवड झालेल्या रेवंत रेड्डी यांनी सोनिया गांधींसोबत सदिच्छा भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सोनिया गांधी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
रविवारी जाहीर झालेल्या निकालानुसार काँग्रेसने ६५, बीआरएस ३९, भाजप ८, एमआयएम ७ आणि सीपीआय १ जागा जिंकली आहे.
महाराष्ट्र सदनात खलबते
मात्र, तेलंगणातील शपथविधी सोहळ्यापूर्वी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात जोरदार गोंधळ झाला. तेलंगणाचे प्रभारी आणि माजी मंत्री माणिकराव ठाकरे महाराष्ट्र सदनात मुक्कामी आहेत. रेवंत रेड्डी बुधवारी दुपारी तेथे आले. शपथविधी सोहळ्याची रूपरेषा आणि मंत्रिमंडळातील इतर सदस्यांबाबत काय निर्णय घ्यायचा याबाबत ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
एक उपमुख्यमंत्री
तेलंगणात दोन उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र यावेळी केवळ दलित मतदारांना खूश करण्यासाठी दलित समाजातील एखादे उपमुख्यमंत्री किंवा महत्त्वाचे मंत्रीपद दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.