Maruti Suzuki Car Mileage Case : कार खरेदी करताना आपल्याकडे तिच्या लुक्स आणि इतर फीचर्सपेक्षा जास्त महत्त्व मायलेजला दिलं जातं. सगळ्यात चांगलं मायलेज देण्यासाठी भारतात मारुती सुझूकीच्या गाड्या प्रसिद्ध आहेत. मात्र, याच कंपनीला आता जाहिरातीत दावा केल्याप्रमाणे मायलेज न दिल्यामुळे एका ग्राहकाला मोबदला द्यावा लागणार आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार, राजीव शर्मा असं तक्रारदार व्यक्तीचं नाव आहे. राजीव यांनी 2004 साली एक मारुती कार खरेदी केली होती. त्यांनी जी जाहिरात पाहून ही कार घेण्याचा निर्णय घेतला, त्यामध्ये या कारचं मायलेज 16 ते 18 किलोमीटर प्रति लीटर असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, प्रत्यक्षात कारचं मायलेज 10.2 किलोमीटर प्रति लीटर असल्याचं राजीव यांना कार खरेदी केल्यानंतर लक्षात आलं.
यानंतर त्यांनी कंपनीविरोधात जिल्हा कंझ्यूमर निवारण फोरममध्ये तक्रार दाखल केली. त्यांनी आपल्या कारची संपूर्ण किंमत व्याजासह परत मिळावी अशी मागणी आपल्या तक्रारीत केली होती. कंझ्यूमर फोरमने ही मागणी मान्य केली नाही, मात्र राजीव यांना एक लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी असा आदेश कंपनीला दिला होता.
कंपनीने नुकसान भरपाई न देता, या निर्णयाविरोधात राज्य आयोगात अपील केली. मात्र, राज्य आयोगाने देखील जिल्हा आयोगाचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर कंपनीने पुन्हा नॅशनल कंझ्यूमर डिस्प्यूट रीड्रेसल कमिशनकडे (NCDRC) दाद मागितली.
यावर NCDRC ने म्हटलं, की “कार खरेदी करताना कोणतीही व्यक्ती मायलेजबद्दल माहिती घेते. विविध गाड्यांच्या मायलेजची तुलना करून मगच कोणती कार घ्यावी याबाबत निर्णय घेतला जातो. सांगितलेलं मायलेज आणि ऑन रोड मायलेज यात तफावत असू शकते. मात्र आकड्यांमध्ये एवढा मोठा फरक असणं अपेक्षित नाही.”
“आम्ही 20 ऑक्टोबर 2004 रोजी प्रसिद्ध झालेली जाहिरात पाहिली, आणि ती एक दिशाभूल करणारी जाहिरात असल्याचं आमचं मत आहे”, असंही NCDRC ने स्पष्ट केलं. त्यामुळे मागचे सर्व निर्णय राष्ट्रीय आयोगाने कायम ठेवले. मारुती सुझूकीने केलेला दावा कंझ्युमर राईट्सचं उल्लंघन असल्याचं म्हणत त्यांनी ग्राहकाला ठरलेली नुकसान भरपाई द्यावी असे आदेश NCDRC ने दिले.