विज्ञान तंत्रज्ञान

Telecom Data Leak : तब्बल 7.5 कोटी भारतीयांचा डेटा लीक, टेलिकॉम मंत्रालयाचं मोबाईल कंपन्यांना सिक्युरिटी ऑडिटचं आवाहन

750 Million Indian users Data Leaked : देशातील तब्बल 7.5 कोटी मोबाईल यूजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती एका सायबर सिक्युरिटी फर्मने दिली आहे. यामुळे भारताच्या टेलिकॉम विभागाने सर्व मोबाईल सर्व्हिस ऑपरेटर्सना सिक्युरिटी ऑडिट करण्याचं आवाहन केलं आहे. टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

क्लाऊडसेक (CloudSEK) नावाच्या सायबर सिक्युरिटी फर्मने असा दावा केला आहे, की हॅकर्स 1.8 टेराबाईट्स एवढा मोठा डेटा डार्क वेबवर विकत आहेत. यामध्ये सुमारे 750 मिलियन भारतीय यूजर्सच्या डेटाचा समावेश आहे. क्लाऊडसेकच्या रिसर्चर्सना एका हॅकरने याबाबत माहिती दिली आहे. अर्थात, यामध्ये आपला हात नसल्याचंही या हॅकरने म्हटलं आहे.

कंपन्यांना आवाहन

हा डेटा मुख्यत्वे टेलिकॉम कंपन्यांकडून लीक झाल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे टेलिकॉम विभागाने कंपन्यांना आपलं सिक्युरिटी ऑडिट कऱण्यास सांगितलं असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अर्थात, टेलिकॉम कंपन्यांनी असं म्हटलं आहे की क्लाऊडसेकच्या रिपोर्टमधील माहिती ही जुनी असून, ती सिक्युरिटी ब्रीच करून चोरलेली नाही.

डार्क वेबवर विक्री

क्लाऊडसेकच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे, की CYBO CREW, CyboDevil, UNIT8200 या ग्रुपने इंडियन मोबाईल नेटवर्क कंझ्युमर डेटाबेस विक्रीसाठी उपलब्ध केला आहे. यामध्ये सुमारे 750 मिलियन भारतीयांची संवेदनशील माहिती उपलब्ध आहे. यात नाव, मोबाईल नंबर, पत्ता, आधार डीटेल्स अशी माहितीचा समावेश आहे. हॅकरने या डेटासाठी 3,000 US डॉलर्सची मागणी केल्याचंही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं.

या डेटा ब्रीचबाबत 23 जानेवारी रोजी माहिती समोर आली होती. यानंतर क्लाऊडसेकने CERT-In, टेलिकॉम मंत्रालय आणि संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. या डेटाचा वापर करून आयडेंटिटी थेफ्ट, रेप्युटेशन डॅमेज, सायबर हल्ले आणि आर्थिक फसवणूक देखील करता येऊ शकते, त्यामुळे ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नसल्याचं क्लाऊडसेकने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *