– वैभव गाटे
सध्या गेममध्ये करिअर करण्याकडे तरुणांचा कल वाढत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एचपी इंडिया गेमिंग लँडस्केप स्टडीनुसार प्रोफेशनल गेमिंग करणारे ४५ टक्क्यांहून अधिक युजर वर्षाला ६ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न कमावतात.
युजरचा गेमिंगकडे वाढता कल पाहता यूट्यूबने नवा गेम खेळला आहे. व्हिडिओ प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबवर आता गेमिंगचा आनंद घेता येणार आहे. काय आहे हे गेम चेजिंग फीचर? जाणून घेऊयात…
यूट्यूब आपल्या युजरसाठी ‘प्लेएबल्स’ हे फीचर आणत आहे. यामध्ये ३७ गेम्स असतील. यात अँग्री बर्ड शोडाऊन, डेली क्रॉसवर्ड, कॅनन बॉल्स थ्री डी अशा गेम्सचा समावेश करण्यात आला आहे.
मात्र, हे फीचर केवळ प्रीमियम युजरसाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रीमियम युजर व्हिडिओ स्ट्रीमिंगसह गेमिंगचा आनंद घेऊ शकतील. प्रीमियम युजरला नुकतेच यासंबंधित नोटिफिकेशन मिळाले आहेत.
‘प्लेएबल्स’द्वारे युजरला गेम डाऊनलोड करण्याची किंवा इन्स्टॉल करण्याची गरज भासणार नाही. डाऊनलोड न करता युजर येथे गेम्स खेळू शकतील. या फीचरची खासियत म्हणजे, हे अँड्रॉइड, वेब आणि आयओएस अशा तिन्ही ठिकाणी वापरता येईल. गेल्या काही वर्षांपासून फेसबुक, नेटफ्लिक्स हे इन्स्टंट गेमवर काम करत आहेत. त्यात आता यूट्यूबनेही एंट्री केली आहे.
बिटा टेस्टिंग सुरू
‘प्लेएबल्स’ सध्या बिटा टेस्टिंगमध्ये असून निवडक प्रीमियम सबस्क्रिबर्सला वापरायला उपलब्ध करून देण्यात आले आहे. या आधारे हे खास फीचर सोशल मीडियावर शेअर करण्यात येत आहे. पुढील वर्षी २८ मार्च २०२४ पर्यंत हे फीचर सर्व प्रीमियम युजरसाठी उपलब्ध होईल. अन्य यूट्यूब वापरकर्त्यांसाठी (मोफत) हे कधी उपलब्ध होईल याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.
कसे वापरता येईल फीचर?
यूट्यूब अप किंवा डेस्कटॉप व्हर्जनवर जाऊन तेथे युजरला यूट्यूब प्रीमियमवर क्लिक करून प्रीमियम सेवा विकत घ्यावी लागेल. यानंतर तुम्हालाही येत्या काही दिवसांत प्लेएबल्सचे अपडेट उपलब्ध होईल.