मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सोमवारी मानांकित खेळाडूंनी पुरूषांच्या एकेरीत आगेकूच केली. तिसरा मानांकित डॅनिल मेदवेदेव व सातवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास या दोन्ही खेळाडूंना प्रतिस्पर्ध्यांकडून कडवा संघर्ष मिळाला.
टेरेंस ॲटमाने याने माघार घेतल्यामुळे मेदवेदेवला पुढे चाल मिळाली, तर त्सित्सिपास याने झिझो बर्गस् याच्यावर चार सेटमध्ये विजय मिळवत घोडदौड केली. महिला एकेरीत कोको गॉफ व ओन्स जॅब्यूएर यांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवले.
डॅनिल मेदवेदेव व पात्रता फेरीमधून आलेला टेरेंस ॲटमाने यांच्यामधील लढतीतील पहिला सेट टेरेंस याने ७-५ असा जिंकला. मात्र या अपयशाला मागे टाकत मेदवेदेव याने पुढील सेटमध्ये ६-२ अशी बाजी मारली. तिसऱ्या सेटच्या सुरुवातीलाच टेरेंसच्या पायाचे स्नायू दुखावले.
तरीही तो खेळत राहिला. अखेर मेदवेदेव याने ६-४ असा हा सेट जिंकत २-१ अशी आघाडी मिळवली. चौथ्या सेटमध्ये मेदवेदेव १-० असा पुढे होता. त्याचप्रसंगी टेरेंस याने माघार घेतली. अखेर मेदवेदेव याला आगेकूच करता आली. झिझो बर्गस् याने स्टेफानोस त्सित्सिपास याच्याविरूद्धच्या लढतीत पहिला सेट ७-५ असा जिंकला.
दोन वेळची विजेती ओसाका पराभूत
दोन वेळा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणारी नाओमी ओसाका हिला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. कॅरोलिन गार्सिया हिने ओसाकाचे आव्हान ६-४, ७-६ असे परतवून लावले. मुलीला जन्म दिल्यानंतर ओसाक पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. चौथी मानांकित कोको गॉफ हिने ॲना कॅरोलिना हिला ६-३, ६-० असे नमवले. तसेच सहावी मानांकित ओन्स जॅब्यूएर हिने युलिया एस. हिच्यावर ६-३, ६-१ अशी मात केली.
मरे, वावरिंकाचा पराभव
अँडी मरे व स्टॅन वावरिंका या अनुभवी टेनिसपटूंना मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. थॉमस मार्टीन याने अँडी मरेविरुद्ध ६-४, ६-२, ६-२ अशी लढत जिंकली. ॲड्रियन मनारिनो याने स्टॅन वावरिंकाचा कडवा संघर्ष ६-४, ३-६, ५-७, ६-३, ६-० असा पाच सेटमध्ये परतवून लावला.