IND vs ENG 1st Test Rishi Sunak : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंडचा युवा खेळाडू शोएब बशिरच्या व्हिसाबाबत गोंधळ निर्माण झाला. पाकिस्तानी मूळ असणाऱ्या शोएब बशिरची इंग्लंड संघात रिप्लेसमेंट म्हणून निवड झाली. मात्र हैदराबाद येथील पहिल्या कसोटीपूर्वी 20 वर्षाच्या बशिरला व्हिसा बाबत निर्माण झालेली अडचण सोडवण्यासाठी मायदेशात परतावे लागले. तो अबू धाबीतून भारतात दाखल होणार होता.
यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने बशिरच्या व्हिसाबाबत निर्माण झालेल्या अडणीवर नाराजी व्यक्त केली होती. भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील बशिरच्या व्हिसाबाबत झालेला गोंधळ लवकरात लवकर संपावा अशी अपेक्षा बोलून दाखवली. आता या वादात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी उडी घेतली आहे.
ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘मी फक्त या प्रकरणाबाबत बोलत नाहीये. ढोबळमानाने सांगायचं झालं तर आम्ही अशा प्रकारचे विषय यापूर्वीच उच्चायुक्तालयाकडे मांडले आहे. आम्ही स्पष्टपणे भारताला सांगितले आहे की प्रत्येकवेळी ब्रिटीश नागरिकांच्या व्हिसाबाबत योग्य वागणूक मिळाली पाहिजे.’
‘आम्हाला पाकिस्तानी मूळ असलेल्या ब्रिटीश नागरिंकाबाबत असे अनुभव मागे देखील आले होते. त्यावेळी आम्ही हा मुद्दा मांडला होता. आम्ही अशा नागरिकांना व्हिसा संदर्भातील येत असलेल्या समस्यांबाबत लंडनमधील भारताच्या उच्चायुक्तालयात मुद्दा मांडला होता.’