क्रीडा

National School Kho Kho Tournament: खो-खो स्‍पर्धेत महाराष्ट्राला विजेतेपद; गुजरात उपविजेता

National School Kho Kho Tournament : पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुल येथे खेळविण्यात आलेल्‍या १७ वर्षाआतील ६७ व्‍या राष्ट्रीय शालेय खो- खो स्‍पर्धेत महाराष्ट्र संघाने लक्षवेधी कामगिरी केली.

मुले व मुली अशा दोन्‍ही संघांमध्ये महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावीत दुहेरी मुकुट प्राप्त केला. तर अंतिम फेरीत पराभूत गुजरातचा संघ दोन्‍ही संघात उपविजेता ठरला.

सुषमा चौधरी, कृष्णा बनसोड यांना सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. तर अमृता पाटील, अवनी वंश उत्कृष्ट खेळाडू ठरले.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी नाशिक आणि क्रीडा उपसंचालक नाशिक विभाग यांच्यातर्फे राष्ट्रीय शालेय खो- खो स्‍पर्धा पार पडली. गुरुवारी (ता. ७) स्पर्धेत खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या मुले आणि मुलींच्या संघानी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा १३-१२ असा पराभव केला. मुलीच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करून गुजरातला १३-०६ असे सात गुण आणि एक डाव राखून पराभूत करून दुहेरी मुकुट महाराष्ट्राच्या नावे कोरले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला ऑलिंपिकपटू दत्तू भोकनळ, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त नरेंद्र छाजेड, स्कूल गेम्स फेडरेशनचे खजिनदार भीष्मय व्यास, प्राचार्य पी. व्ही रसाळ, प्राचार्य सचिन माळी यांची उपस्‍थिती होती. विजेत्या खेळाडूंना आकर्षक चषक, पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले.

वैयक्‍तिक कामगिरीवर खेळाडू सन्‍मानित

स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू सुषमा चौधरी आणि कृष्णा बनसोडे (दोघीही महाराष्ट्र) यांना गौरवण्यात आले. तर उत्कृष्ट आक्रमक म्हणून अजय भवभोर (गुजरात) आणि अमृता पाटील (महाराष्ट्र). उत्कृष्ट बचावपटू म्हणून अवनी वंश (गुजराथ) आणि भावेश म्हासदे यांनाही आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.

स्‍पर्धेतील निकाल असा-

मुले : विजेता- महाराष्ट्र, उपविजेता- गुजरात, तृतीय- केरळ, चौथा- उत्तर प्रदेश.

मुली : विजेता- महाराष्ट्र, उपविजेता- गुजरात, तृतीय- पंजाब, चौथा- ओरिसा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *