सांगोला तालुक्यात सध्या हिवाळी विविध स्पर्धा मोठ्या उत्साहात साजरा होत आहेत. नेत्यांचा वाढदिवस असो, शाळेचे स्नेहसंमेलन व इतर कारणांनी सध्या क्रिकेट, कबड्डी, खो-खो,
आट्यापाट्या अशा स्पर्धा मोठ्या उत्साहात घेतल्या जात आहेत. सांगोल्यातील टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेच्या पत्रकार, पोलीस, वकील, समाजसेवक, अधिकारी, राजकारणी यांच्या अनोख्या मैत्रीपूर्ण सामन्याची संपूर्ण सांगोला शहर आणि तालुक्यात जोरदार चर्चा रंगली होती.
सांगोल्यातील न्यू इंग्लिश स्कूल मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या टेनिस क्रिकेट स्पर्धेत पहिल्याच मैत्रीपूर्ण सामन्यात सांगोला पत्रकार किंग या संघाने सांगोला पोलिसांचा पराभव केला.
सांगोला पत्रकार किंग संघाने नाणेफेक जिंकून कर्णधार आनंद दौंडे यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सांगोला पोलीस संघाला निर्धारित ६ षटकांत ६० धावांवर रोखले. पोलीस संघाकडून खेळताना नितीन घुले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांनी चांगली फलंदाजी केली.
विजयासाठी ६१ धावांचा पाठलाग करताना पत्रकार संघाची सुरुवात अडखळत झाली पहिल्याच चेंडूवर सलामीवीर लवकर परतला. मात्र त्यानंतर आलेल्या ५ व्या षटकातच ६१ धावांचे विजयी लक्ष्य गाठले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
दुसऱ्या सामन्यात शाहू फुले आंबेडकर या समाजसेवक संघाने राष्ट्रवादी इलेव्हन संघाचा पराभव केला. मेडिकल संघाने कृषी संघाचा पराभव केला. अशा वेगवेगळ्या आयोजित केलेल्या अनोख्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमुळे सर्वत्र चर्चेला मात्र उधाण आले होते.
अशा वेगळ्या आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यामुळे आम्हालाही आमच्या कामातून थोडासा आनंद मिळाला. खरोखरच असे सामने ठराविक काळानंतर नेहमी आयोजित केले जावेत.
– शिवाजी शिंदे, तालुका कृषी अधिकारी, सांगोला.
पत्रकारांसोबत क्रिकेट खेळताना आनंद मिळाला. आम्ही एकत्रित येत या सामन्याचा आनंद लुटला. खेळ व खेळाचा आनंद लुटत असताना सर्व क्षेत्रातील मंडळी एकत्रित येत असल्याने हे वेगळेच आनंदाचे कारण बनले होते.
– बाबासाहेब पाटील, पोलीस हवालदार, सांगोला.