हवामान

Hailstorm Forecast : विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा

Pune News : उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसासह तुरळक ठिकाणी गारपीट झाली आहे. आज (ता. २७) विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसासह, गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात जोरदार वारे, विजांसह पावसाची शक्यता कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

नैर्ऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावरही चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे आज (ता. २७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची, तसेच उद्यापर्यंत (ता. २९) त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

रविवारी (ता. २६) उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या विविध भागात मेघ गर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तुरळक ठिकाणी गारपीट झाली. आज (ता.२७) विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पाऊस, गारपिटीचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली असून, किमानातही वाढ कायम आहे. विदर्भात मात्र गारठा वाढल्याचे चित्र आहे. रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये डहाणू येथे देशातील उच्चांकी ३७.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. तर विदर्भातील यवतमाळ येथे राज्यातील नीचांकी १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

रविवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३०.३ (२१.३), धुळे ३२.० (१५.६), जळगाव ३१.७(१८.१), कोल्हापूर २९.९ (२१.६), महाबळेश्वर २६.० (१६.९), नाशिक ३१.० (२०.४), निफाड ३१.० (१९.०), सांगली २९.७ (२२.२), सातारा ३१.१ (१८.१), सोलापूर ३३.७(२१.६), सांताक्रूझ ३५.७ (२२.७), डहाणू ३७.८ (२३.८), रत्नागिरी ३४.३ (२४.४),

छत्रपती संभाजीनगर ३०.८ (२१.२), नांदेड ३१.४ (२१.०), परभणी ३०.९ (२०.१), अकोला ३२.५ (१९.५), अमरावती ३१.२ (१७.७), बुलढाणा ३१.० (१८.८), ब्रह्मपूरी ३२.५ (१७.१), चंद्रपूर २९.०(१६.६), गडचिरोली ३१.२ (१७.६), गोंदिया २९.७ (१३.९), नागपूर ३०.३(१६.०), वर्धा ३०.२(१७.६), वाशीम ३३.०(१६.२), यवतमाळ ३२.२ (१३.०).

गारपिटीसह, मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :

बुलडाणा, अकोला, वाशिम.

गारपीट, पावसाचा इशारा (येलो अलर्ट):

जालना, परभणी, हिंगोली.

जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट):

पालघर, ठाणे, रायगड, नाशिक, जळगाव, नगर, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *