हवामान

Maharashtra Rain : राज्यात थंडीत वाढ; पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होईल.

Weather Update : महाराष्ट्रावर या आठवड्यात १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. त्यामुळे कमाल व किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होईल. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्‍चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहण्यामुळे मोठ्या प्रमाणात वारे बाष्प वाहून आणतील.

त्यामुळे आज आणि उद्या (ता. २६,२७) आकाश पूर्णतः ढगाळ राहून पावसाची शक्यता निर्माण होईल. तसेच मराठवाडा व विदर्भातही हवामान ढगाळ राहण्यामुळे तेथेही अल्पशा पावसाची शक्यता राहील. प्रशांत महासागराच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअस वरून घसरून २९ ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत आले आहे.

हिंदी महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाच्या तापमानात वाढ होऊन ते ३० ते ३१ अंश सेल्सिअस झाले आहे. तसेच अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढल्याने व बंगालच्या उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान २९ ते ३० अंश सेल्सिअस असल्याने तेथे हवेचे दाब कमी होतील. त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात बाष्प जमा होऊन अवेळी व अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

आज (ता. २६) बंगालच्या उपसागरात लहानसे चक्रीवादळ तयार होऊन ते मंगळवारी (ता. २८) पश्‍चिम बंगालच्या दिशेने जाईल. तसेच शुक्रवारीही (ता. १ डिसेंबर) बंगालच्या उपसागरात लहानसे चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. हे वादळही बांगलादेशच्या दिशेने जाईल. या वर्षी ता. १ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील त्या त्या जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झालेला नाही.

नांदेड, जालना, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नगर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, बुलडाणा अशा अनेक जिल्ह्यांत पावसाची कमतरता दिसून आली. त्यामुळे येत्या काळात या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोकण

आज (ता. २६) ठाणे व पालघर जिल्ह्यांत १ मि.मी. व उद्या (ता.२७) ३० ते ३६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तर रायगड जिल्ह्यात आज (ता. २६) १ मि.मी. व उद्या (ता.२७) १७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आज (ता. २६) ६ ते ८ मि.मी. व उद्या (ता. २७) १२ ते २० मि.मी. पावसाची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील.

रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ५४ ते ५८ टक्के, रायगड जिल्ह्यात ६१ टक्के, तर पालघर व ठाणे जिल्ह्यांत ७५ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक व धुळे जिल्ह्यांत आज (ता. २६) ३ मि.मी, तर नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत १ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२७) जळगाव जिल्ह्यात १० मि.मी., धुळे जिल्ह्यात ३४ मि.मी., नंदुरबार जिल्ह्यात ४२ मि.मी. आणि नाशिक जिल्ह्यात ५८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग १० ते १५ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत १९ ते २० अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. तर किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १५ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७१ ते ८३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ८३ टक्के राहील.

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांत आज (ता. २६) २ ते ४ मि.मी. तर उद्या (ता.२७) धाराशिव जिल्ह्यात ८ मि.मी., बीड जिल्ह्यात १३ मि.मी., जालना जिल्ह्यांत १० मि.मी. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्यता आहे.

बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत कमाल तापमानात मोठी घसरण होईल. कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस, बीड जिल्ह्यात २२ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, धाराशिव जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस असे राहील. तर लातूर व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस आणि हिंगोली व नांदेड जिल्ह्यांत २७ ते २८ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस तर नांदेड, बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर व परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान २० अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८१ ते ८२ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत ५८ ते ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५८ टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ

बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत अल्पशा पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ कि.मी. राहील. बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत कमाल तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअस, तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ५७ टक्के राहील.

मध्य विदर्भ

आज (ता. २६) आणि उद्या (ता.२७) यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ, नागपूर व वर्धा जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस राहील.

वर्धा व नागपूर जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. तर उर्वरित जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३३ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान थंड व कोरडे राहील.

पूर्व विदर्भ

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या सर्व जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ कि.मी. राहील. कमाल तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात १७ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत १६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ३२ ते ३८ टक्के राहील. गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान थंड व कोरडे राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र

आज (ता. २६) कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत १५ ते १६ मि.मी. तर पुणे व सांगली जिल्ह्यात ६ ते ९ मि.मी., नगर जिल्ह्यात ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. उद्या (ता.२७) नगर, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांत ३३ ते ३५ मि.मी. तर सातारा जिल्ह्यात २६ मि.मी. व सोलापूर जिल्ह्यात ५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १५ कि.मी. राहील. पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमानात घसरण होऊन ते २० ते २३ अंश सेल्सिअस राहील. सातारा व सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात १८ ते १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६६ टक्के राहील.

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *