बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर मिचाँग चक्रीवादळात झालं होतं. याचा मोठा परिणाम वातावरणात दिसून येत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर मिचाँग चक्रीवादळात झालं होतं. या चक्रीवादळामुळे वातावरणात मोठे बदल झाल्याचे दिसून येत आहे. काही भागांमध्ये थंडी वाढली आहे तर काही भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फ पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये तापमानात घट होऊन थंडी वाढली आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रासह, १९ राज्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. काही राज्यांमध्ये गारपीट होऊ शकते, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
मिचाँग चक्रीवादळाचा आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना मोठा फटका बसला आहे. चेन्नईमध्ये अतिमुसळधार पाऊस झाल्याने रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं आहे. या पावसाने आतापर्यंत १७ जणांचा बळी घेतला आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत आहे.
या राज्यांना पावसाचा अलर्ट?
स्कायमेट वेदरच्या माहितीनुसार, आज ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेशात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
झारखंड, बिहारचा काही भाग, दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि लक्षद्वीपमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
याशिवाय छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही प्रमाणात हलका पाऊस पडेल. ८ आणि ९ डिसेंबरला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.