हवामान

Weather Update: उत्तर भारतात थंडीचा कडाका, दाट धुक्यांमुळे २४ रेल्वे विलंबाने

उत्तर, मध्य आणि ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. दाट धुके कायम आहेत, 15 जानेवारीपर्यंत कडाक्याच्या थंडीची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे. तर दाट धुक्क्यांचा परिणाम रेल्वे आणि विमान उड्डाणांवर झाल्याचे दिसून येत आहे.

उत्तर भारतात, 11 आणि 12 जानेवारी (गुरुवार आणि शुक्रवार) काही भागात सकाळी दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्याचे प्रमाण कमी होऊ शकते. तर दाट धुक्यामुळे देशाच्या विविध भागातून दिल्लीला जाणाऱ्या 24 गाड्या उशिराने धावत असल्याचे रेल्वेने सांगितले.

11 ते 15 जानेवारी या कालावधीत पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या भागांमध्ये सकाळी काही तास दाट धुक्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज (गुरुवारी) पहाटे 5:30 वाजता पंजाबमधील भटिंडा आणि आग्रा येथे दृश्यमानता 0 मीटर, त्रिपुराच्या आगरतळा येथे 25 मीटर तर जम्मू, उत्तर प्रदेशातील वाराणसी, मध्य प्रदेशातील सतना, बिहारमधील पूर्णिया, आसाममधील तेजपूर आणि हरियानामध्ये 50 मीटरपर्यंत खाली आली आहे.

दिल्लीच्या पालम भागात 100 मीटर आणि भोपाळ आणि राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये 200 मीटरवर दृश्यमानता नोंदवण्यात आली.

11 आणि 12 जानेवारीला जम्मू विभाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तर मध्य प्रदेश, ओडिशा, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा, चंदीगड आणि काही भागांमध्ये थंडी कायम राहील.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवसांत मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांमध्ये किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पुढील दोन दिवसात तामिळनाडू, केरळ, किनारपट्टी कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून त्यानंतर कोरडे हवामान राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *