कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी विठ्ठल शेलार व रामदास मारणे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे; तर या गुन्ह्याचा सूत्रधार गणेश मारणे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने शेलार आणि रामदास मारणे यांना बुधवारी (ता. २४) न्यायालयात हजर करण्यात आले होते. फरार गणेश मारणे आणि अटक आरोपी यांच्याकडे एकत्रित तपास करण्याकरिता त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती.
ही मागणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी फेटाळली. दरम्यान, या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी गणेश मारणे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. मोहोळ खून प्रकरणात शेलार आणि गणेश मारणे हे मुख्य सूत्रधार आहेत. शेलार आणि मारणे यांनी मोहोळचा खून होण्यापूर्वी एक महिना आधी बैठक घेतली असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे.
गणेश मारणेचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी तपास पथके पाठविण्यात आली होती. एका ठिकाणाहून गाडी जप्त करण्यात आली आहे. त्यासाठी शेलार व मारणे या दोघांची मदत झाली. मुख्य सूत्रधार मिळाल्यावर अनेक मुद्दे समोर येऊ शकतील. मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी या दोन्ही आरोपींना चार दिवस पोलिस कोठडी द्यावी, अशी मागणी तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी केली.
आरोपीच्या वतीने ॲड. डी. एस. भोईटे आणि लोक अभिरक्षक कार्यालयाच्या ॲड. रोहिणी लांघे यांनी बाजू मांडली. पोलिसांच्या तपासात नवीन काहीच मुद्दे नाहीत. प्रत्येक रिमांड रिपोर्टमध्ये मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी मागितली जाते. तपासात कोणतीही प्रगती दिसत नाही, असा युक्तिवाद ॲड. भोईटे यांनी केला.
सरकारी वकील नीलिमा इथापे-यादव यांनी त्यावर आक्षेप घेत, आत्तापर्यंतच्या तपासात आरोपी कुठे भेटले याचे स्थळ, सराव कुठे केला याची जागा पोलिसांनी शोधली आहे. गाडीदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. त्यामुळे तपासात प्रगती आहे, असा युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने शेलार व मारणे यांना एक फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.