८० कोटींच्या निधीस मंजुरी; केज तालुक्याला फायदा
केज : केज विधानसभा मतदारसंघातील गावठाणसाठी सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजनेंतर्गत ८० कोटींच्या निधीस मंजुरी मिळाल्याने काम पूर्ण होताच गावठाण फिडर आणि शेती पंपासाठी फिडर वेगवेगळे केले जाणार आहे. यामुळे तालुक्यातील गावांचा अखंडित वीज पुरवठ्याच्या प्रश्न मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार नमिता मुंदडा यांनी शनिवारी (ता.२३) दिली . तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावठाण आणि शेतीपंपाचे फिडर एकच असल्याने गावठाणास अखंडित वीजपुरवठा मिळणे शक्य होत नव्हते.
ग्रामीण भागातील गावठाणातील ग्रामस्थांना घरगुती वापरासाठी अखंडित वीज मिळाली पाहिजे, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येकी ५० टक्के निधीतून सुधारित वितरण क्षेत्र (आरडीएसएस) योजना राबविण्यात येते. भविष्यातील अखंडित विजेच्या समस्येवर मात करण्यासाठी या योजनेचा लाभ केज विधानसभा मतदारसंघाला मिळण्यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी ऊर्जा विभागाकडे पाठपुरावा केला होता.
त्यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने मंजूर झालेल्या निधीतून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच गावठाण व शेतीपंपासाठी लागणाऱ्या वीज पुरवठ्याच्या वेगवेगळ्या फिडरचे काम सुरू होणार आहे. यातून गावठाण फिडर आणि शेती पंपासाठीचे वेगवेगळे फिडर केले जाणार आहेत. त्यामुळे गावठाणात अखंडित वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी नियमानुसार लोड आहे, आवश्यकता आहे ते या सर्व्हेक्षणात घेतले असून, त्याठिकाणी १०० केव्ही क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार आहेत.
अनेक ठिकाणी जुने ११ केव्ही, ३३ केव्ही एल. टी. कंडक्टरची साईज कमी पडत आहे, कंडक्टरचे तुकडे पडत आहेत. त्याजागी उच्च दर्जाचे कंडक्टर बसविण्यात येणार आहेत. नवीन ११ केव्ही, ३३ केव्ही लिंकलाईनची कामे करण्यात येतील. इन्सुलेटर, फिडर नूतनीकरण, दोन खांबांत जास्त अंतर असेल तर नवीन खांब उभारणे, नादुरुस्त खांब, ११ केव्ही, ३३ केव्ही बदलणे इत्यादी कामे केली जातील. तसेच ३३ केव्ही सबस्टेशन, ११ केव्ही फिडर वेगवेगळे करण्यात येणार असून, ज्या गावातील रोहित्र वारंवार फेल होत आहेत, तेथे एबी केबल टाकण्यात येणार आहेत. या सर्व कामासाठी ८० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून, कार्यारंभ आदेश होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे.