येत्या काही महिन्यांत देशभरात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी शिवसेनेने ग्रामीण भागात बैठका आणि नियुक्ती सत्र सुरू केले. मोखाडा तालुक्यात बूथप्रमुख व शिवदूतांची नियुक्ती करून पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीची तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले.
तसेच इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या बैठका, मेळावे सुरू झाले आहेत. मोखाड्यात शिंदे गटाचे प्राबल्य आहे.
पक्षाचा अधिक विस्तार व पक्ष मजबूत करण्यासाठी मोखाडा तालुका प्रमुख अमोल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी बुथप्रमुखांनी शिवदूतांची यादी तयार केली.
तालुक्यातील सर्व ७७ बूथवर शिवदूत नेमण्यात आले आहे. या बैठकीत उपसभापती प्रदीप वाघ यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून आगामी निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले.
या वेळी नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार करण्यात आला. अन्य पक्षांमधून अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या बैठकीला सभापती भास्कर थेतले, उपसभापती प्रदीप वाघ, १६ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला व युवा सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.