Sangli News : गळीत हंगाम अर्ध्यावर आल्यानंतर जिल्ह्यातील ऊसदरावर तोडगा निघाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदारांच्या बैठकीत पहिली उचल ३१७५ रुपये एकरकमी शेतकऱ्यांना देण्याचे ठरले आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृत्पी धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. २७) ही बैठक झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी धोडमिसे यांच्याकडे जिल्हाधिकारी पदाचा तात्पुरता कार्यभार दिला आहे.
बैठकीला क्रांती साखर कारखान्याचे नेते तथा आमदार अरुण लाड, राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, पोलिस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्यासह साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, प्रतिनिधी उपस्थितीत होते.
श्रीमती धोसमिसे म्हणाल्या, ‘‘ऊस दराबाबत दोन्ही गटांनी सामंजस्य दाखवले. सात कारखान्यांच्या दराबाबत चर्चा झाली. कारखानदारांनी पहिली उचल एकरकमी ३१७५ रुपये देण्याचे मान्य केले आहे.’’ राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे साखराळे, वाटेगाव आणि कारंदवाडी युनिट तसेच क्रांती, सोनहीरा, विश्वास, हुतात्मा साखर कारखान्यांच्या दरांबाबत हा तोडगा काढण्यात आला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ डिसेंबरला झालेल्या गत बैठकीत साडेबारा टक्के साखर उतारा असलेल्या कारखान्यांनी पहिली उचल ३२५० रुपये द्यावी, १० टक्केच्या पुढील कारखान्यांनी ३२०० रुपये द्यावेत.
तर, दुष्काळी आणि आजारी कारखान्यांनी ३१०० रुपये पहिली उचल द्यावी, असा प्रस्ताव माजी खासदार तथा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला होता. कोल्हापुरात ज्याप्रमाणे एफआरपी अधिक शंभर रुपये हा हट्ट देखील शेतकरी संघटनेने सोडून दिल्याने आजच्या बैठकीतील सरसकट कारखान्यांनी पहिली उचल ३१७५ रुपये एकरकमी देण्याचे मान्य केले आहे.
शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांच्यात अडीच तास बैठक चालली. शेतकरी संघटनेचे संजय बेले, भागवत जाधव, बाबा सांदरे, धन्यकुमार पाटील, रोहीत पाटील, संदीप पाटील, दीपक मगदुम आदींची उपस्थिती होती.
दीर्घकाळ आंदोलन चालवणे, हे शेतकरी हिताचे नव्हते. दोन पावले मागे येण्यातही शहाणपण असते. अर्धा हंगाम संपला आहे. शेतकऱ्यांच्या पदरी अधिकची रक्कम पाडू शकलो, याचे समाधान आहे.